दिल्लीतील निजामुद्दीन मशिद परिसर सील; 200 जणांची चाचणी, 2000 लोक क्वारंटाईन


नवी दिल्ली – कोरोनाची लक्षणे नवी दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील २०० लोकांमध्ये आढळली असून वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी सुरक्षेसाठी सर्व परिसर सील केला आहे. त्याचबरोबर लॉकडाउनच्या नियमांचे पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत.

मशिदीत १८ मार्च रोजी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या राज्यांतील ५०० हून अधिक लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हे सर्वजण कार्यक्रम संपल्यानंतर आपापल्या घऱी परतले आहेत. रुग्णालयात ज्या २०० लोकांना दाखल करण्यात आले आहे, ते सर्वजण मशिदीच्या जवळच वास्तव्याला आहेत. रविवारी ३४ लोकांना तर सोमवारी १५० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

इतर राज्यांमधील लोकांनाही निजामुद्दीन येथील कार्यक्रमामुळे कोरोनाची लागण झाली आहे. याच कार्यक्रमात शुक्रवारी सहभागी झालेल्या अदंमान निकोबार येथील सहा जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या कार्यक्रमात हे सर्वजण सहभागी झाले होते, त्यानंतर कोलकातामार्गेत पोर्ट ब्लेअरला परतले होते. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या श्रीनगरमधील ६५ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. तर आंध्र प्रदेशातील ५२ वर्षीय व्यक्तीला लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मशिदीत प्रवेश करण्यास पोलिसांनी बंदी घातली असून परिसरात गेल्या एक आठवड्यापासून मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Comment