लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याच्या निव्वळ अफवा


नवी दिल्ली – सध्या देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु असून त्यातच आता या लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. पण या चर्चा केवळ अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दिले आहे.

राजीव गौबा केंद्राच्या या निर्णयाबाबत माहिती देताना म्हणाले, देशातील लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याच्या चर्चा ऐकून मला आश्चर्य वाटले. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी देशाला संबोधित करताना संपूर्ण देशात पुढील २१ दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती. मोदी म्हणाले होते, यापूर्वी झालेल्या जनता कर्फ्यूने दाखवून दिले की, ज्यावेळी देशावर कोणतेही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. कोरोनासारख्या महारोगाने जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवले आहे. त्या राष्ट्रांकडे साधन नाही असे नाही. पण, हा आजार एवढ्या तीव्रतेने पसरत आहे की, तयारीच करता येत नसल्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे,

आजचा या लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे. पण कोरोनाग्रस्तांचा आकडा तरीही वाढत असल्यामुळे २१ दिवसांनंतरही लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाणार असल्याची चर्चा सर्वत्र आणि सोशल मीडियामधून सुरु झाली आहे. पण याबाबत अद्याप कोणीही अधिकृतरित्या माहिती दिली नसल्याने या केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट होते. याबाबत आता कॅबनेट सचिवांनीही लॉकडाऊन वाढवण्याचा असा कुठलाही सरकारचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment