जमावबंदीचे उल्लंघन करत टेरेसवर सामूहिक नमाज पठण करणाऱ्यांना अटक


पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानंतर राज्यात जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले. दोन किंवा चार पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. देशभरातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि गर्दी टाळली जावी म्हणून बंद ठेवण्यात आली आहेत.

पण पिंपरी-चिंचवड शहरात मुस्लीम बांधवांनी सरकार आणि पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत एकत्र येऊन रहिवासी इमारतीच्या गच्चीवर सामूहिक नमाज पठण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनदरम्यान आणि जमावबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नियमांचे उल्लंघन केल्या प्रकऱणी आतापर्यंत 333 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देशभरात अनेक शहरांमध्ये वारंवार आवाहन करूनही अनेक नागरिक लॉकडाऊन आणि जमावबंदीचे आदेश गांभीर्याने पाळत नसल्याचे समोर आले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय अनेक नागरिक लॉकडाऊनच्या काळात एकत्र येत असल्याचे किंवा बाहेर फिरत असल्याचे दिसत आहे. नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिला आहे.

Leave a Comment