कोरोना : सोशल डिस्टंसिंगमुळे दिल्ली कारागृहातील ४१९ कैद्यांची सुटका


नवी दिल्ली : देशाला कोरोना वायरसच्या विळख्यातून वाचवण्यासाठी देशभरात पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला. हा निर्णय नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून घेण्यात आला. हा विषाणू माणसांच्या संपर्कात आल्यामुळेच पसरु शकतो हे सिद्ध झाले आहे. जगातील सर्वच तुरुंगांमध्ये कैद्यांची संख्या जास्त आहे. अशावेळी कोरोनामुळे कैद्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

हा धोका पाहता शनिवारी ४१९ कैद्यांना दिल्लीतील तुरुंगातून सोडण्यात आल्याची माहिती दिल्ली तुरुंगाचे महानिरीक्षक आणि प्रवक्ता राज कुमार यांनी दिली आहे. सोडण्यात येत असलेल्या ४१९ कैद्यांपैकी ३५६ कैदी हे अंतरिम जामिनातील वर्गात मोडतात. ६३ कैद्यांना आपत्कालिन पॅरॉलवर सोडण्यात आले आहे. ४५ दिवसांसाठी अंतरिम जामिनावर कैद्याला सोडण्यात येते. तर आकस्मिक पॅरॉलवर कैदी ८ आठवडे बाहेर राहु शकतो. हा निर्णय तुरुंगात असलेल्या कैद्यांमध्ये सोशल डिस्टंसिंग राहावे यासाठी घेण्यात आला आहे.

१० हजार एवढी दिल्लीमध्ये तुरुंगात राहणाऱ्या कैद्यांची क्षमता आहे. पण येथे १७ हजार ५०० कैदी आहेत. सोशल डिस्टंसिंग राहावे यासाठी साधारण तीन हजार कैद्यांना सोडण्याचा विचार सुरु आहे. दिल्लीत १८ कैद्यांना कोरोना संशयित असल्याने गर्दीपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. जे कोणी नवे कैदी येत आहेत त्यांना वेगळ्या ठिकाणी स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. बाहेरुन आलेल्या कैद्यामुळे आतल्या कैद्यांना धोका पोहोचू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment