कोरोनाः मुंबईतील ४० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू


मुंबई – कोरोनाने मुंबईत रविवारी आणखी एक बळी घेतला असून उपचारादरम्यान कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. कोरोनासदृश्य लक्षण महिलेत आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. त्यानंतर महिलेला संसर्ग झाल्याचे कोरोना तपासणीत निष्पन्न झाले. दरम्यान, कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संसर्गांचा राज्यात दिवसेंदिवस आकडा वाढत असताना मृतांची संख्येतही धिम्या गतीने वाढू लागली आहे. यात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यु झालेल्या मुंबईत रविवारी आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. यासंदर्भातील माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

एका ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. शनिवारी केईएम रुग्णालयात या महिलेला दाखल करण्यात आले होते. महिलेला उच्च रक्तदाबासह श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. त्यानंतर तिला रुग्णालयात आणण्यात आले. या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. या महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या महिलेवर शनिवारी रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, महापालिकेने ही माहिती मुद्दाम लपवून ठेवली असा आरोप केला जात आहे. तसेच या घटनेनंतर केईएम रुग्णालयाचा अपघात विभाग अद्याप सुरू असून, विभागातील ४० डॉक्टर आणि परिचारिकांना वेगळे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment