कोरोना : पुण्याच्या डॉ. मिनल भोसले यांनी तयार केले देशातील पहिले चाचणी किट

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सरकार वेगवेगळी पावले उचलली जात आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारत अधिक नागरिकांची चाचणी करत नसल्याची टीका गेली अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र आता पुण्यातील मायलॅब रिसर्च अँड डेव्हलपमेंटने कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वदेशी किट तयार केले आहे. विशेष गोष्ट म्हणजे या सर्वांमागे एक महिला आहे.

मायलॅब रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या प्रमुख मिनल दाखवे-भोसले यांनी हे किट सहा आठवड्यांच्या आत तयार केले आहे. या किटला पॅथो डिटेक्ट असे नाव देण्यात आलेले आहे. मागील आठवड्यातच मिनल यांनी बाळाला देखील जन्म दिला आहे. मात्र गर्भवती असताना देखील त्या फेब्रुवारीपासून या किटवर काम करत होत्या.

मिनल म्हणाल्या की, ही एक इमर्जेंसी होती. त्यामुळे मी हे आव्हान स्विकारले. मला देशासाठी कार्य करायचे होते. याशिवाय त्यांनी सांगितले की त्यांच्या 10 जणांच्या टिमने अथक परिश्रम केल्याने हे शक्य झाले.

बाळाला जन्म देण्याच्या अवघ्या एक दिवस आधी त्यांनी किट नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीला मुल्यांकनासाठी पाठवले होते. हे किट आता बाजारात आले असून, यामुळे चाचणीमध्ये वाढ होईल. एका मुलाखतीमध्ये मिनल यांनी सांगितले की, आमचे किट अडीच तासात चाचणीचे रिझल्ट देते तर परदेशातून मागवण्यात आलेले किट 6 ते 7 तास लावते.

मायलॅब डिस्कवरी सोल्यूशन लोणावळा येथील फॅक्ट्रीमध्ये दिवसाला या 15 हजार किट्सची निर्मिती करू शकते व गरज पडल्यास 25 हजार किट्स देखील करणे शक्य आहे. 150 किट्सची पहिली बॅच पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा आणि बंगळुरूला पाठवण्यात देखील आली आहे.

मायलॅबच्या या एका किटद्वारे 100 चाचण्या करणे शक्य आहे व यासाठी केवळ 1200 रुपये खर्च येईल. परदेशी किट्ससाठी 4,500 रुपये खर्च येत असे.

Leave a Comment