काही लोक मरणार म्हणून पूर्ण देश बंद करायचा का? – ब्राझील राष्ट्राध्यक्ष


रिओ दि जानिरो (ब्राझील) : कोरोना व्हायरससारख्या जागतिक संकटाच्या काळातही राजकारणाची चिखलफेक आपल्यासारखा विकसनशील देश म्हणून जवळच्या वाटणाऱ्या ब्राझीलमध्ये पाहायला मिळते असून त्याठिकाणी या कठिण काळात थेट राष्ट्राध्यक्ष विरुद्ध प्रांतांचे गर्व्हनर असा सामना रंगला आहे. लोकांची गर्दी होते आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे शक्य होत नाही म्हणून आपल्या देशाला उत्पादने बंद करणे परवडणारे नाही. आता काही लोक मरणारच, त्याबद्दल दुःख आहे. पण गाडीचे अपघात होतात म्हणून आपण कार फॅक्टरी बंद करू शकत नाही, असे धक्कादायक वक्तव्य ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांनी केले आहे.

कोरोना व्हायरसची साथ ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरली आहे आणि हाच प्रांत ब्राझीलची आर्थिक राजधानी आहे. ब्राझीलमध्ये शुक्रवारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3417 वर पोहोचली होती. कोरोना व्हायरसमुळे या देशातील 82 लोकांनी आपला जीव गमावला आहे. चक्क राष्ट्राध्यक्षांनीच या आकड्यांच्या सत्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही जण परिस्थितीचा फायदा उठवत राजकीय खेळी करायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ब्राझीलमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानंतर 26 प्रांताच्या गर्व्हनरनी अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाउन करत असल्याचे जाहीर केले. राष्ट्राध्यक्षांचाच या लॉकडाउनला विरोध आहे. साओ पावलोमध्ये सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत आणि सर्वाधिक मृत्यू याच राज्यात झाले आहेत. साओ पावलोमध्ये 1233 केसेस सापडल्या असून आतापर्यंत 68 लोकांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीमुळे साओ पावलोचे गर्व्हनर जोआओ डोरिया यांनी लॉकडाउन जाहीर केला. डोरिया हे पूर्वी बोल्सोनारो यांच्याबरोबर होते. पण आता ते बोल्सोनारो यांचे राजकीय विरोधक मानले जातात. #BrazilCannotStop ही कँपेन राष्ट्राध्यक्ष बोल्सोरानो यांनी चालवली आहे, असे म्हणत त्यांना थेट विरोध डोरिया यांनी केला आहे.

तर डोरिया हे परिस्थितीचा राजकीय फायदा उचलून देशाला नुकसान पोहोचवत असल्याचे राष्ट्राध्यक्षांचे म्हणणे आहे. कोरोना व्हायरससारख्या जागतिक महासाथीच्या संकट काळातही ब्राझीलमध्ये या पातळीवरचे गलिच्छ राजकारण पाहायला मिळत आहे.

Leave a Comment