येत्या चार ते पाच दिवसात पुणे-मुंबईचा दूध पुरवठा ठप्प होण्याची शक्यता


कोल्हापूर : देशभरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आल्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश केंद्र तसेच राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. पण पुणे-मुंबईमधील कर्मचारी कोरोनाच्या भीतीपोटी गावी गेल्यामुळे दुग्धव्यवसायावर संकट उभे राहिले आहे. त्यामुळे पुणे-मुंबईचा दूध पुरवठा येत्या चार ते पाच दिवसात ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसह खासगी कंपन्यांमधील कामगारांना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून वर्क फ्रॉर्म होम करण्याची सूचना देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी हे शक्य नसल्यामुळे कामगारांना घरीच राहण्याची सूचना देण्यात आली आहे. याचा परिणाम दूध उत्पादनावरही झाला आहे. कोल्हापूरच्या प्रसिद्ध गोकुळ दूध संघामध्ये 50 टक्के कर्मचारी कामावर आहेत. पण पुणे-मुंबईमधील कर्मचारी गावी गेले आहेत. कोरोनाच्या भीतीने बरेच कर्मचारीही कामावर येण्यास तयार नसल्यामुळे पुण्या-मुंबईचा दूध पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुधाची वाहतूक करणारे ड्रायव्हर क्लिनर काम करण्यास तयार नसल्यामुळे दुधाचे पॅकिंग करणारे कामगार मुंबईमध्येही उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यात भर म्हणजे, पशुखाद्य कारखान्यातील कामगारही गावी गेल्याने अडचण निर्माण झाल्या आहेत. कोल्हापुरातील गोकुळ दूधकडून यावर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment