कोरोना : दिव्यांगांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप


मुंबई : केंद्र सरकारसोबतच राज्य शासनाने देखील कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात संचारबंदीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. यावेळी घरातील एका व्यक्तीनेच जाऊन वस्तू घरेदी कराव्या आणि गर्दी टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने या पार्श्वभुमीवर एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. दिव्यांगाना येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेता त्यांच्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.



त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे आता घरपोच वाटप केले जाईल. तसेच टोल फ्री नंबरवर संपर्क करून मदत मिळवता येईल असे आश्वासन कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. समाजातील कोणत्याही घटकाला संचारबंदीच्या काळात अडचण येऊ नये याची खबरदारी महाविकास आघाडी सरकार घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील दिव्यांगांसाठी शासनाने काही दूरध्वनी क्रमांक जाहीर केल्याचे मुंडे म्हणाले. अडचणीच्या काळात दिव्यांगांनी आपल्या विभागानुसार पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे ट्विट मुंडे यांनी केले आहे. स्वत:चे एका महिन्याचे वेतन कोरोनाच्या लढ्यासाठी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment