कोरोनाचे संकट : सिंधुदुर्गात सापडला पहिला रुग्ण


मुंबई : राज्याला कोरोना आपल्या विळख्यात ओढत असतानाचे चित्र सध्यातरी दिसत आहे. त्यातच आज राज्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२५ झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, आज एकूण २६९ जण विविध रुग्णालयात भरती झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

गोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणारी एक ६५ वर्षीय महिला टंडन हॉस्पिटल, डी वाय पाटील हॉस्पिटल अशा दोन रुग्णालयांकडून संदर्भित होऊन वाशी येथील जनरल हॉस्पिटल येथे अत्यंत गंभीर अवस्थेत दिनांक २४ मार्च रोजी दुपारी भरती झाली. तिचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला. ती कोरोना बाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन काल स्पष्ट झाले. तिच्या परदेश प्रवासाबाबत अथवा इतर संपर्काबाबत माहिती घेण्यात येत आहे.

आजच्या नवीन बाधित रुग्णांपैकी सिंधुदुर्गचा रुग्ण हा एका कोरोना बाधित रुग्णाचा सहवासित असून त्याने या रुग्णासोबत एकाच डब्यातून रेल्वे प्रवास केल्याचे समजते. नागपूरच्या बाधित रुग्णाने दिल्ली येथे प्रवास केला होता पण त्याने परदेश प्रवास केल्याचे स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment