महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी; वाशीमधील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू


मुंबई : कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील प्रादुर्भाव वाढत असून त्यातच आता महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. एका 65 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा नवी मुंबईतील वाशी खासगी रूग्णालयात मृत्यू झाल्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण चार जणांचे बळी घेतले आहेत.

कोरोना बाधित रुग्णांची महाराष्ट्रात संख्या 122 वरून 130 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 23 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या तरीही सातत्याने वाढत आहे. तसेच काल मुंबई, सांगली, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली.

देशात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या 649 कोरोना बाधित असून त्यातील 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये 112 रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत देशात लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment