‘लॉकडाऊन’चे उल्लंघन केल्यास दोन वर्षांपर्यंतची शिक्षा, केंद्राची नियमावली


नवी दिल्ली : सोमवारच्या मध्यरात्रीपासून कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चे संपूर्ण देशभर समान पद्धतीने पालन व्हावे; यासाठी सविस्तर नियमावली राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने जारी केली आहे. त्यासोबतच या नियमावलीचे कसोशीने व कठोरपणे पालन करण्याचा आदेशही केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी या ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली असली, तरी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या कार्यकारिणीने हा कठोर उपाय योजण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करून उपर्युक्त नियमावली व आदेश जारी करण्यात आला आहे. या निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारच्या हाती भारतीय दंड विधानाचे कलम १८८ आधीपासूनच आहे. सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या वैधानिक आदेशाचे उल्लंघन करणे, हा या कलमान्वये गुन्हा आहे व त्यासाठी सहा महिन्यांपर्यंतच्या कैदेची तरतूद आहे; परंतु प्राप्त परिस्थितीत याहून कडक शिक्षेची गरज लक्षात घेऊन सरकारने त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या ५१ ते ६० या कलमांचाही वापर करण्याचा आदेश दिला आहे.

Leave a Comment