मोदी सरकारच्या निर्णयाचे राहुल गांधींकडून कौतुक


नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी आज गरीबांच्या मदतीसाठी एक मोठी घोषणा केली आहे. देशातील अनेक नेत्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

गुरुवारी गरीब आणि गरजूंसाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मदत पॅकेज जाहीर केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मोदी सरकारने योग्य दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत कोरोनाच्या साथीवर आणि त्याच्या आर्थिक परिणामापासून गरीब जनतेचा बचाव करण्यासाठी 1.70 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. गरजूंना ही रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे.

ट्विट करून राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सरकारने आज आर्थिक मदत पॅकेजची घोषणा करणे ही योग्य दिशेने उचलेलेल पहिले पाऊल असून भारतातील शेतकरी, रोजंदारी कामगार, महिला आणि वृद्ध लॉकडाऊनचा सामना करीत आहेत. सर्व वर्गातील लोकांचा विचार करुन मदत पॅकेजेसमध्ये अर्थमंत्र्यांनी हे पाऊल उचलले आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण जाहीर केले आहे. अर्थमंत्री म्हणाले की रेशन दुकानातून 80 दशलक्ष कुटुंबांना तीन महिन्यासाठी 5 किलो गहू किंवा एक किलो डाळ-तांदळासह मोफत देण्यात येईल.

Leave a Comment