जगभरात सद्यस्थितीत जवळपास पावणेपाच लाख कोरोनाग्रस्त, 21 हजाराहून अधिक बळी


मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असून त्यात कोरोनाचे उगम स्थान असणाऱ्या चीनमध्ये स्थिती आटोक्यात आली असली, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव इटली, स्पेन, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जवळपास पावणेपाच लाख लोक जगभरात कोरोनाबाधित झाले आहेत. तर 21 हजार 200 लोकांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. तर दिलासादायक बाब अशी की, आतापर्यंत 1 लाख 15 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तरी अजून जवळपास तीन लाख 33 हजार कोरोनाचे रुग्ण जगभरात आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे जवळपास 14 हजार 733 जण गंभीर आहेत. जगभरात गेल्या 24 तासात कोरोना बाधितांच्या आकड्यात 46 हजारांची तर बळींच्या आकड्यात 2306 ची भर पडली आहे.

इटलीत चीन पेक्षा दुप्पट बळी कोरोनाने घेतले आहेत. तर चीनला स्पेनने देखील मागे टाकले आहे. कोरोनामुळे इटलीत मृत्यूचे तांडव सुरुच आहे. एकाच दिवशी सहाशेपेक्षा जास्त माणसे दगावण्याचा कालचा सलग सहावा दिवस होता. इटलीतील एकूण बळींची संख्या साडे सात हजारावर गेली आहे. त्यातील साडे चार हजार मृत्यू उत्तर इटलीतील लोम्बार्डी प्रांतात झाले आहेत. काल रुग्णांच्या संख्येत साधारण पाच हजारांनी भर पडली, तिथे एकूण 75 हजार रुग्ण आहेत. सर्वात जास्त नुकसान झालेल्या लोम्बार्डी प्रांतात काल 296 लोकांनी जीव गमावला. त्या आधीच्या 24 तासात तिथला आकडा 402 होता.

Leave a Comment