कस्तुरबा रूग्णालयाचा नवा विक्रम, चोवीस तासात ३७२ चाचण्या


मुंबई : दिवसागणिक राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पण तरी देखील राज्यासह पालिकेचा आरोग्य विभागही या वाढत्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी अहोरात्र झटतो आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयाच्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चमूच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. अवघ्या चोवीस तासात या चमूने कोरोनाच्या ३७२ वैद्यकीय चाचण्या केल्यामुळे या अविरतपणे झटणाऱ्या यंत्रणांना मुंबईकरांचा सलाम आहे.

जसजसा राज्यात कोरोना पसरू लागला, या आजाराचे महत्त्वाचे केंद्र हे त्यावेळी मुंबई व पुणे शहर ठरल्यामुळे या मेट्रो शहरातील यंत्रणांनी अधिक सतर्कता पाळून रात्रीचा दिवस करून मोठ्या प्रमाणात यंत्रणा निर्माण केली आणि पहिल्या टप्प्यात कस्तुरबा, त्यानंतर अन्य पालिका रुग्णालयांत कोरोनासाठी सज्ज केली. त्यानंतर या रुग्णालयांप्रमाणे खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांचाही यात अंतर्भाव करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता खासगी-सरकारी प्रयोगशाळांतील कोरोना चाचण्यांची क्षमताही वाढविण्यात आली आहे.

दररोज कस्तुरबा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे त्यांच्या तपासण्या, अहवाल यांची गतीही वाढायला हवी, कमी वेळात अचूक अहवालासाठी काम करणाऱ्या या चमूने मागील चोवीस तासांत हा नवा विक्रम नोंदविला आहे. यानंतर आता केईएम आणि कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळांच्या चाचण्यांची क्षमताही वाढविण्यात आली आहे.

Leave a Comment