विना लॉकडाऊन या देशाने अशी केली कोरोनावर मात

चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने आज महामारीचे रुप धारण केले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये या व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र चीनच्या वुहानपासून अवघ्या 1382 किमी अंतरावर स्थित दक्षिण कोरियाने मात्र या व्हायरसवर मात केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी या देशाने विशेष पावले उचलली.

दक्षिण कोरियाकडे अमेरिका, इटली आणि स्पेनप्रमाणे मजबूत अर्थव्यवस्था नसताना देखील अन्य देशांप्रमाणे नागरिकांवर कोणतेही आदेश लादले नाहीत. दक्षिण कोरियाने कोरोनापासून वाचण्यासाठी कर्फ्यू अथवा लॉकडाऊन देखील केले नाही.

कोरोना संक्रमित देशांमध्ये दक्षिण कोरिया आज 8व्या स्थानावर आहे. या देशात 9137 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 3500 जण यातून बरे झाले आहेत. यात 129 जणांचा मृत्यू देखील झाला आहे.

दक्षिण कोरियाने कोरोना व्हायरसशी कसे लढावे, याचे एक उदाहरण जगासमोर ठेवले आहे. आधी अशी स्थिती नव्हती. सुरूवातीच्या टप्प्यात 8000 जणांना या व्हायरसचा संसर्ग झाला होता. मात्र मागील दोन दिवसात केवळ 12 जणांना याचा संसर्ग झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने देखील दक्षिण कोरियाचे यासाठी कौतूक केले. कोरोनाशी लढण्यासाठी या देशाने आधीच तयारी केली होती. सरकारने प्रमुख अधिकाऱ्यांसह मेडिकल कंपन्याच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन चाचणी किट बनविण्यास सुरूवात केली. चांगल्या उपचारासाठी सरकारने आधीच लोकांची तपासणी करण्यास सुरूवात केली. ज्यासाठी संपुर्ण देशात 600 पेक्षा अधिक टेस्ट सेंटर उघडले.

या व्हायरसच्या स्क्रिनिंगसाठी देशातील मोठमोठ्या इमारती, हॉटेल, पार्किंग आणि सार्वजनिक ठिकाणी थर्मल इमेजिंग कॅमेरे लावले. जेणेकरून ताप असलेल्या व्यक्तीची ओळख होऊ शकेल. तपासणी झाल्यानंतरच हॉटेलमध्ये जाण्याची परवानगी मिळत असे.

याशिवाय येथील तज्ञांनी हातांद्वारे संक्रमित होण्यापासून वाचण्यासाठी एक नवीन पद्धत शोधली. जर व्यक्ती उजव्या हाताने काम करत असेल तर दरवाजाचे हँडल पकडणे, मोबाईल सह प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी डावा हात वापरण्याचा सल्ला दिला. शरीरात व्हायरसचा संसर्ग हातांद्वारे अधिक होतो, त्यामुळे ही पद्धत खूपच फायदेशीर ठरली.

Leave a Comment