अत्यावश्यक सेवेसाठी 24X7 हेल्पलाईन; केंद्राचे राज्यांना निर्देश

देशव्यापी लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर केंद्राने सर्व राज्यांना 24X7 कंट्रोल रूम्स, राज्य व जिल्हा स्तरावर हेल्पाईन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय 21 दिवस अत्यावश्यक सेवा व सुविधा अखंडित सुरू राहण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यास सांगितले आहे.

गृह मंत्रालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिव आणि डीजीपींशी साधलेल्या संवादात सांगितले की, लॉकडाऊन यशस्वीरित्या पार पडत असताना, उत्पादन, प्रोसेसिंग, ट्रांसपोर्ट, वितरण, अशा गोष्टींना महत्त्वाच्या सेवांसाठी विशेष परिस्थिती सुट देण्यात यावी.

गृह मंत्रालयाने सांगितले की, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी 24X7 कंट्रोल रुम्स, हेल्पलाईन सुरू करावी. जेणेकरून, वस्तू व सेवा पुरवणाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातील. नोडल अधिकारी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांशी या संदर्भात समन्वय साधेल. अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरू राहावा यासाठी हे महत्त्वाचे आहे.

तसेच, ई-कॉमर्स साईट्सची ट्रांसपोर्ट आणि डिलिव्हरी सेवा व्यवस्थित सुरू करण्यासाठी सरकार काम करत आहे.

Leave a Comment