जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ ला जागतिक महामारी जाहीर केली आहे आणि देशात पंतप्रधानांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. विशेष म्हणजे कोविडचा एक चांगला परिणाम असा झाला आहे अन्य वेळी फोन वरून उद्योजक, व्यावसायिक यांना धमकावून खंडण्या मागणाऱ्या खंडणीखोरांचे फोन एकदम बंद झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या हप्ते विरोधी पथकाचे प्रमुख अजय सावंत यांनी ही माहिती दिली आहे.
करोना इफेक्ट – खंडणीखोरांच्या फोनकॉल्समध्ये लक्षणीय घट
अजय सावंत म्हणाले गेल्या काही दिवसात मुंबईत भाईगिरी एकदम बंद झाली आहे. अजय सावंत डॉन एजाज लकडावालाशी संबंधित अनेक केसेसचा तपास करत आहेत. एजाजला जानेवारीत पटना येथून पकडण्यात आले आहे. तेव्हा चीन मध्ये करोनाचा प्रभाव होता पण भारतात नव्हता.
एजाजला पकडल्याच्या दुसऱ्याचा आठवड्यात डॉन रवी पुजारी याचे सेनेगल मधून भारतात प्रत्यार्पण केले गेले होते मात्र तरीही मुंबईतील खंडणीखोरांचे फोनकॉल प्रमाण घटलेले नव्हते. प्रसाद पुजारी याने एका बिल्डरला १० लाखाची खंडणी मागितली होती आणि एका शिवसेना नेत्याला गोळ्या घातल्या होत्या. आता मात्र त्याचेही तोंड करोनामुळे बंद झाले असल्याचे दिसत आहे. सावंत सांगतात गेले आठ दिवस मुंबईत लॉकडाऊन आहेच आता त्यात आणखी २१ दिवसांची भर पडली आहे.
याचा परिणाम व्यवसाय ठप्प होण्यात झाला आहे. त्यामुळे खंडणीसाठी कितीही फोन केले आणि धमक्या दिल्या तरी रक्कम मिळणार नाही याची जाणीव अंडरवर्ल्डला झाली आहे. मुंबईत जेलमधून सुद्धा हे गुंड खंडणीसाठी फोन करतात. दाऊद सारखे अनेक डॉन पाकिस्तानात आश्रय घेऊन आहेत मात्र पाकिस्तानांत सुद्धा करोनाचा उद्रेक झाल्याने त्यांच्या हालचालीही थंडावल्या आहेत.