संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा दणका; ठोकला दीड लाखाचा दंड - Majha Paper

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा दणका; ठोकला दीड लाखाचा दंड


नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्यात संचारबंदी लागू केली असून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर ही प्रमुख शहर पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले असताना देखील शासनाच्या आदेशाचे काही नागरिक उल्लंघन करताना दिसत आहेत. तर खासगी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जात आहे.

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्येही असाच प्रकार घडत होता. पण संचारबंदीच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. मनपाच्या शोध पथकाने दोन कंपन्यांना दीड लाखांचा दंड ठोठावला आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व खासगी, कॉर्पोरेट व अन्य आस्थापना 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. असे असतानाही वर्धमान नगर येथील ठवकर कंपनीतील सुमारे 60 ते 70 लोकांना कामावर बोलावण्यात आले होते. कंपनीचे शटर बंद ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेतले जात होते. याबाबत मनपाच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तेथे धाड मारली. आदेशाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच दंड ठोठावण्यात आला. वेळोवेळी सांगूनही जर नागरिक कायद्याचे उल्लंघन करीत असेल तर यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

Leave a Comment