कोरोना : मुंबईकर का खेळत आहे आपल्याच जीवाशी?


मुंबई : काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केल्यानंतरही मोठ्या संख्येने मुंबईकर वाहनचालक रस्त्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. आज सकाळी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनचालकांची गर्दी दिसून आली. दरम्यान प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. वाहनचालकांना घराबाहेर पडण्याचे नेमके कारण पोलिसांकडून विचारले जात आहे. पण मुंबईकरांना एवढे कोणते महत्वाचं काम आहे? की ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नसल्याचा प्रश्न उभा राहत आहे.


मुंबईकरांनी संचारबंदीच्या आदेशाला हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहेत. ठाण्यातून मुंबईला येणाऱ्या गाड्यांच्या चेकनाक्यावर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. राज्यात कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक परिस्थितीला गांभीर्याने घेत नाही आहेत. या गाड्या पोलिसांनी मुलुंड चेकनाक्यावर अडवल्या. पण, यावेळी पोलिसांसोबत काही मुंबईकरांनी हुज्जतही घातली. जमावबंदीचे राज्यात आदेश आहेत. या आदेशाचा भंग केल्यास वाहने जप्त करण्यात येतील असा इशारा ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे. अशीच परिस्थिती पुण्यात देखील आहे. तर नागरिकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये, असे वारंवार प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यानंतर संचारबंदीचे आदेश दिले. जमावबंदीला पुरेसे यश न मिळाल्याने काल राज्य सरकारने आणखी कठोर पावले उचलत राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. काल ही घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जिल्ह्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या असून खाजगी वाहनांना वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि वाहतूक मात्र सुरु राहील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रस्त्यावर गाड्यांची गर्दी पाहता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद केली होती. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेल आहे. असे असताना देखील शहरात गाड्या धावताना दिसत आहेत.

Leave a Comment