अद्यापही अनेक लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही – नरेंद्र मोदी


मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले आहेत. पण जमावबंदी असूनही लोक रस्त्यावर येत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाऊनला अद्यापही अनेक लोक गांभीर्याने घेत नसल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. तर स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, असा दम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भरला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला. देशभरातील जनता कर्फ्यू हटल्यानंतर मुंबईकर रस्त्यावर उतरलेले दिसले. सकाळी 9 वाजच्या सुमारास मुंलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. पण, गर्दी कमी करण्यासाठी टोल नाक्यावरुन वाहनांना मुंबईच्या दिशेने तात्काळ सोडण्यात आले. देशात अनेक ठिकाणी असेच चित्र पाहायला मिळाले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी घरा बाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार सरकारकडून केले जाते आहे. पण याचे पालन नागरिकांकडून होत नसल्याचे दिसत असल्यामुळे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त करत नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.


याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत, लॉकडाऊनला अनेक लोक अजूनही गांभीर्याने घेत नाहीत. कृपया करुन स्वत:ला वाचवा, तुमच्या कुटुंबाला वाचवा, गांभीर्याने आदेशांचे पालन करा. राज्य सरकारांना माझी सूचना आहे की त्यांनी नियम आणि कायदा पाळायला भाग पाडावे, असे म्हटले आहे.


तर लोकांना गर्दी करुन कायदा मोडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. 144 कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका. गर्दी टाळा, प्रवास टाळा सांगूनही लोक गाड्या घेऊन बाहेर आल्याने सरकार आता कडक पावले उचलणार का? जमावबंदी आदेश न पाळण्यावर सरकार कारवाई करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Comment