उद्या मध्यरात्रीपासून आंतरराज्यातील विमानाची उड्डाणे बंद


नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रातील मोदी सरकारने या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आंतरराज्यातील विमानाची उड्डाणे उद्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार असल्यामुळे आतंरराज्य विमानांना उद्या रात्री 11.59 मिनिटांपर्यंत सर्व विमानांचे सुरक्षित लॅंडिंग करण्यास सांगण्यात आले आहे. आतापर्यंत देशात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आंतरराज्यातील विमान उड्डाणे बंद करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारतर्फे देशभरातील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती देण्यात आली. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढतो आहे. आतापर्यंत देशात 415 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशभरात 19 राज्यांमध्ये लॉकडाउनची परिस्थिती आहे. आणखी 6 राज्यांमध्ये अंशतः लॉकडाउनची परिस्थिती आहे.

याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) संचालक बलराम भार्गव म्हणाले, देशभरात 12 लॅबोरेटरीजच्या चेन कोरोनाची चाचणी करण्याचे काम करत आहेत. देशभरात या 12 लॅबची 15000 कलेक्शन सेंटर आहेत. त्याचबरोबर उद्याचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा आहे. कोरोना व्हायरस दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात तर पोहोचला नाही ना? याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च निकाल देणार आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डॉ. आर. आर. गंगाखेडकर यांनी मॅथेमेटिकल मॉडेलवर काम सुरू असून, मंगळवारी त्याचा निकाल येईल असे सांगितले आहे.

Leave a Comment