संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी लागू, मुख्यमंत्र्यांचा निर्णय


मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिगद्वारे दिली. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या कमीत कमी किंबहुना थांबवायची आहे आणि म्हणून उद्या सकाळपासून मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातील संपूर्ण नागरी भागामध्ये 144 कलम नाईलाजाने लावत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

नागरी भागात उद्यापासून जमावबंदी लागू होईल, पण जीवनावश्यक वस्तू चालू राहतील. वीज पुरवठा, बँका आणि त्यासंबंधी व्यवहार चालू राहतील. पण जिथे वर्क फ्रॉम होम शक्य तिथे करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. उद्यापासून पुढचे काही दिवस अधिक दक्षतेने पार पाडायचे आहेत. मी आपल्याला सातत्याने सांगत आहे, आपण आता संवेदनशील टप्प्यात पाऊल टाकलेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारी कर्मचारी संख्या २५ वरुन ५ टक्क्यांवर आणली आहे. केवळ ५ टक्के सरकारी कर्मचारी राज्याचा भार सांभाळणार आहे. त्यांच्यावर जास्त भार देऊ नका. हे संकट टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्या. जीवनावश्यक कामांसाठीच बससेवा चालू राहील. मंदिरे, मशिदी चालू असतील तर ती तातडीने बंद करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

या संकटावर मात कशी करायची या चिंतेने सर्व जग ग्रासलं आहे. आज नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू आहे. रात्री अनेक जणांना वाटेल की आता नऊ वाजून गेले आता घराबाहेर पडूया. मी आपल्याला थोडीशी आणखी काळजी घ्यायला सांगणार आहे. किंबहुना नाईलाज म्हणून संचारबंदी किंवा जनता कर्फ्यूचा निर्णय घ्यावा लागत आहे. हा संयम आपल्याला उद्या सकाळपर्यंत ठेवायचा आहे. कृपया नऊ वाजेनंतर घराबाहेर पडू नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Leave a Comment