राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पन्नाशीजवळ


मुंबई – राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहचली असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. पण आता त्यात वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. त्यातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आम्ही सर्वतोपरी काळजी घेत असल्याची माहिती दिली आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी, घरी सुरक्षित रहावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. ३१ तारखेपर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. फेज २ मधून फेज ३ मध्ये जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

४८ वा रुग्ण २२ वर्षांची महिला आहे. ४९ वा रुग्ण ५१ वर्षांचा पुरुष आहे. तो अहमदनगरचा आहे त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री अहमदनगरची असल्याचीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. चार नवे रुग्ण १२ तासात आढळले आहेत. संसर्ग होण्याचे प्रमाण ५० मध्ये १० आहे. संसर्ग होऊ नये याची आम्ही दक्षता घेत असल्याचेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. मुंबईची लोकल बंद करणे हा शेवटचा पर्याय असेल. सध्या १२ देश असे आहेत ज्यातून आलेले रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळत आहेत. या १२ देशांना आपण बंदी घातल्याचेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

मुंबईतील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर असून इतर रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. पुणे IT सेक्टरमध्ये १०० टक्के वर्क फ्रॉम होम करण्यात आले आहे. काल रात्री त्यासंदर्भातील ऑर्डर इश्यू झाल्याचेही टोपे यांनी सांगितले. आम्ही महाराष्ट्रात केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार नियमांची अंमलबजावणी करतो आहोत. मुंबई पुणे बससेवा बंद करण्यात आलेली नाही. पण लोकांनी कार्यालयात येणे टाळावे. प्रवास टाळावा, फेज थ्रीमध्ये जाण्यापासून आपला बचाव कसा होईल याची काळजी आम्ही घेत आहोत. ट्रेन बंद करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, पण तो वेळ लोकांनी आमच्यावर आणू नये असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment