कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा उद्यापासून बंद


मुंबई : कोरोना व्हायरस देशभरात वेगाने पसरत असून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही १६८ वर पोहोचली आहे, तर महाराष्ट्रातील ४९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत खबरदारी घेतली जात आहे. मुंबईचा सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार उद्या दिनांक २० मार्च २०२० पासून ते ३१ मार्च २०२० पर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट व मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाद्वारे घेण्यात आला आहे. त्याच प्रमाणे १ एप्रिल २०२० पासून सेवा नियमितपणे सुरू राहील. सर्व नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच स्वतःची काळजी घ्यावी व शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे.

सदृश्य लॉक डाऊन मुंबईत करण्यात आले आहे. शाळा, कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच खासगी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्विकारण्यास सांगितले आहे. तसेच एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. एक दिवस आड करून सरकारी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे आणि ५० टक्के कर्मचारी फक्त कार्यालयात उपस्थित राहावेत असे आदेश देण्यात आले आहेत. डबेवाल्यांनी याच पार्श्वभूमीवर सेवा काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment