मुंबईत २६ हजार लोकांच्या आयसोलेशनची व्यवस्था


भारतात करोनाचा उपद्रव अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक होत असल्याचे दिसून आल्यामुळे देशाच्या या आर्थिक राजधानीत ३१ मार्च पर्यंत परदेशातून येणाऱ्या लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याची व्यवस्था केली गेली असून २६ हजार लोकांना या सुविधेचा लाभ मिळू शकणार आहे. मुंबईत दररोज किमान २३ फ्लाईट्स सध्या येत आहेत. त्यात युएई, दुबई, ओमान, कतार देशातून येणाऱ्या लोकांना १४ दिवस आयसोलेशन मध्ये ठेवले जाणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दुबईहून आलेल्या १५ लोकांना करोना संसर्ग झाल्याचे दिसून आल्यावर मुंबई महापालिकेने पवई येथील नवीन अभियंता प्रशिक्षण केंद्रात आयसोलेशन व्यवस्था केली आहे. मरोळ येथील सेवन हिल्स हॉस्पिटल मध्येही आयसोलेशन वॉर्ड सुरु केला गेला आहे. कॉन्फरन्स रुम्स मध्येही वार्ड बनवून १०० लोकांची व्यवस्था केली गेली आहे.

या महिनाअखेरी आखाती देशातून मोठ्या प्रमाणावर भारतीय मुंबईत परतणार आहेत. विमानतळावर त्यांची तपासणी झाल्यावर जे स्वस्थ आहेत आणि ज्यांची मुंबईत घरे आहेत त्यांना घरी पाठविले जाईल मात्र घरात त्यांना १४ दिवस वेगळे राहावे लागेल. पुणे नाशिक अश्या मुंबई जवळ असलेल्या शहरात जाणाऱ्या ज्या लोकात संसर्ग आढळणार नाही त्यानाही घरी पाठविले जातील मात्र त्यांना सार्वजनिक वाहनातून प्रवास करता येणार नाही. घरी गेल्यावर त्यानाही १४ दिवस आयसोलेशन मध्ये राहावे लागणार आहे. मुंबई पासून दूर राहणाऱ्यांना पोवई, सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये १४ दिवस राहावे लागेल.

मुंबई मध्ये आखाती देशातून अथवा परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या हातावर शिक्का मारला जाणार असून देशाच्या अन्य भागात त्यांना विमान प्रवास करता येणार नाही असे स्पष्ट केले गेले आहे,

Leave a Comment