कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना समन्स


पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. हे समन्स कोरेगाव भीमा आयोगाकडून बजावण्यात आले असून शरद पवार यांना ४ एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुण्यातील भीमा कोरेगाव येथे २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराची कारणे आयोगाकडून तपासली जात असून हे समन्स त्याच पार्श्वभूमीवर बजावण्यात आले आहे. शरद पवारांची साक्ष यावेळी नोंदवली जाणार आहे.

याआधी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार असल्याचे कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी सांगितले होते. एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केली होती. त्यांनी त्यात कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिल्यानंतर पवारांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.

कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी केली होती. त्यांनी चौकशी आयोगाकडे तसा अर्ज देखील केला होता. त्यानंतर आयोगाने शरद पवारांना चौकशीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Comment