अन्यथा लोकल सार्वजनिक प्रवास सेवा बंद कराव्या लागतील – राज्य सरकार


मुंबई – आता 42 वर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वच कोरोनाग्रस्तांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आतापर्यंत 800 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 42 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर खास लक्ष ठेवले जात आहे. त्याचबरोबर पुण्यातील एनआयव्हीला तातडीने भेट देऊन टोपे तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. एनआयव्हीचे नवीन लॅबचे व्हॅलिडेशन करण्याचे महत्वाचे काम आहे. परंतु, कुठल्याही माध्यमाला तेथे आत जाण्याची परवानगी नसेल असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना आरोग्य मंत्री राजेश टोपे पुढे म्हणाले, संशयित रुग्णांसोबत काही ठिकाणी शेजारी आणि इतरांकडून दुजाभाव केला जात आहे. विशेष म्हणजे, इतर देशातून पुण्यात आपल्या घरी परतणाऱ्या स्थानिकांना त्यांच्याच घरात जाण्यापासून शेजाऱ्यांनी रोखल्याचे प्रकार घडले आहेत. कृपया, कोरोनाग्रस्ताशी कुणीही भेदभाव करू नये. हा आजार बरा होणारा असल्यामुळे घाबरू नये, असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केले आहे.

अनेक उपाययोजना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी राबवल्या जात आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे, गर्दी कमी करणे हा असून नागरिकांना अशा परिस्थितीत विनाकारण गर्दी करू नये. आवश्यक असेल तरच प्रवास करावा. कंपन्या आणि संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कृपया वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी. जेणेकरून लोकल आणि इतर ठिकाणी गर्दी कमी होईल. सरकारी कार्यालयांमध्ये बंद ठेवण्यात आला नसला तरीही किमान कर्मचाऱ्यांमध्ये काम कसे करता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे, लोकांनी स्वयंशिस्तीने गर्दी टाळावी. विनाकारण गर्दी होत राहिल्यास आणि लोकांनी सरकारला सहकार्य न केल्यास लोकल आणि इतर सार्वजनिक प्रवास सेवा बंद करण्याचा विचारही करावा लागू शकतो असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment