३१ मार्चपर्यंत मुंबईतील ऑर्केस्ट्रा, डिस्कोथेक्स, डान्सबार, पब्स बंद


मुंबई – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर मुंबई पोलिसांकडून आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई शहर व उपनगरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले पब्स, डिस्कोथेक्स, डान्सबार, ऑर्केस्ट्रा सारख्या गर्दी जमण्याची ठिकाणे तात्पुरती बंद करण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत. 31 मार्चपर्यंत हे बंदी आदेश लागू असणार असून यात पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनाविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, मुंबई शहरातील खासगी पर्यटन संस्थांना या अगोदर 15 मार्चला परदेशात व देशांतर्गत पर्यटकांची ने-आण करण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश 15 मार्च ते 31 मार्च 2020 पर्यंत लागू असणार आहेत. पण, खासगी पर्यटन संस्थांसह कोणाला अपवादात्मक परिस्थितीत प्रवास करायचा असेल तर मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून ह्याची परवानगी संबंधितांना घ्यावी लागणार आहे.

नागरिकांना कोरोना व्हायरसच्या प्रभावापासून सावध करण्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात नागरिकांशी पोलिसांकडून संवाद साधला जात आहे. योग्य काळजी घेत नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हँड सॅनिटायझरचा वापर करावा, त्याचबरोबर मास्क वापरावे, या सारख्या सूचना दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता सतर्कता बाळगावी म्हणून मुंबई पोलिसांकडून आवाहन केले जात आहे.

Leave a Comment