आपल्याला ढेकर का येतात?


जेवणानंतर ढेकर देणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. किंबहुना जेवणानंतर ढेकर दिल्यानंतर जेवणाऱ्याचे मन आणि भूक दोन्ही तृप्त झाले अशी मान्यता आपल्याकडे आहे. तर काही लोक ढेकर येण्याला अपचनाचे लक्षण समजतात. अश्या वेळी ढेकर येण्यामागे नक्की कोणते शास्त्रीय कारण आहे हे जाणून घेणे अगत्याचे आहे. तसेच जर ढेकर जास्त येत असतील, किंवा अजिबात येत नसतील तर त्यासाठी काय करायला हवे, हे ही जाणून घेणे गरजेचे आहे.

आपण जेव्हा जेवत असतो, तेव्हा अन्नासोबत थोडी हवा देखील आपल्या पोटामध्ये जात असते. आपल्या शरीरातील अन्ननलिका आणि पोटाच्या मध्ये एक लहानशी झडप असते. ही झडप आपण अन्न ग्रहण करीत असताना उघडते. अन्न पोटामध्ये गेल्यानंतर ही झडप आपोआप बंद होते. अन्नासोबत थोडी हवा देखील त्या झडपेमध्ये शिरते. यालाच एरोफेजिया असे म्हणतात. जेव्हा आपण खूप घाई-घाईत जेवतो, तेव्हा अन्न व्यवस्थित न चावता घाईघाईने गिळतो. अश्या वेळी पोटामध्ये अन्नासोबत जास्त हवा शिरते. जेव्हा पोटामध्ये प्रमाणापेक्षा अधिक हवा शिरते, तेव्हा ती हवा शरीराबाहेर टाकली जावी असा निर्देश मेंदूद्वारे पचनसंस्थेला दिला जातो. तेव्हा पोटाच्या मासपेशी ताठरतात, आणि पोटावरील झडप काही काळाकरिता उघडते. त्या झडपेमधून पोटामधील साठलेली हवा घश्याच्या मार्गे, तोंडावाटे बाहेर टाकली जाते. यालाच आपण ढेकर म्हणतो. पोटामध्ये जितकी हवा जास्त, तितके ढेकर येण्याचे प्रमाण जास्त. ही प्रक्रिया संपूर्णपणे नैसर्गिक आहे.

पण काही वेळा पोटामध्ये गॅसेस साठत राहतात, पण ढेकरेवाटे बाहेर पडत नाहीत, तेव्हा मात्र अस्वस्थता जाणवू लागते. पोट फुगते, दुखू लागते, आणि अन्नपचन व्यवस्थित होत नाही. अन्नाचे पचन नीट होत नसल्याने शरीरामध्ये सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अश्या वेळी पोटातील गॅसेस बाहेर पडण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याची देखील गरज पडते.

जर अपचन होऊन पोटामध्ये साठलेली हवा बाहेर पडण्यास अडचण होत असेल, तर त्यावर काही उपाय करता येऊ शकतात. सर्वप्रथम जमिनीवर झोपावे, आणि आपले दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून, शक्य तितके छातीच्या जवळ आणावेत. त्यामुळे शरीरातून गॅसेस बाहेर पडण्यास मदत होते. शरीरामध्ये गॅसेस उद्भविण्याचा त्रास जर वारंवार होत असेल, तर मुळातच ज्या पदार्थांमुळे शरीरामध्ये गॅसेस उत्पन्न होतात, अश्या पदार्थांचे सेवन कमी करावे. अन्न खाताना प्रत्येक घास सावकाश चावून खावा. तसेच तोंडामध्ये घास असताना पाणी पिणे टाळावे. कार्बोनेटेड ड्रिंक्सचे सेवन कमी करावे, तसेच सतत च्युईंग गम चघळत राहिल्याने देखील तोंडावाटे खूपशी हवा पोटामध्ये जात असते. त्यामुळे च्युईंग गमचे सेवन करू नये. धूम्रपान करण्याच्या प्रक्रियेद्वारे देखील खूपशी हवा पोटामध्ये हवा घेतली जाते. ज्यांना कवळी असते, त्यांच्या बाबतीत देखील जेवताना खूपशी हवा पोटामध्ये घेतली जाते. त्यामुळे त्यादृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

तसेच ढेकर परत-परत येऊ देखील, तर ते हे देखील त्रासाचेच आहे. अश्या वेळी थोड्या थोड्या वेळाने थंड पाणी घोट-घोट पीत राहावे. तसेच इलायची घालून केलेला चहा प्यावा, किंवा इलायची दिवसातून दोन तीन वेळा चघाळावी. बडोशेप घालून उकळलेले पाणी प्यायल्याने देखील आराम मिळतो. लिंबाच्या रसाच्या सेवनाने ढेकर येणे कमी होते. वारंवार ढेकर येत असल्यास कोथिंबीरीची पाने खावीत. त्यामुळे ढेकर येणे बंद होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment