शासन निर्णयाची पायमल्ली करणाऱ्या भुजबळांवर सरकार कारवाई करणार का?


पुणे – केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारने देखील कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या दिशेने पाऊले उचलली आहेत. ३१ मार्चपर्यंत राज्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे त्याचबरोबर राज्य सरकारकडून सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण पुण्यातील ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या संस्थाचालकांकडून सरकारच्या याच आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. राज्याचे ग्राम विकासमंत्री छगन भुजबळ यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत आदेशाचे पालन करता शाळेचे उद्घाटन केले आहे.

जगभरातील बहुतेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात देखील या आजाराचे रुग्ण आढळले असून, याच दरम्यान देशात दोन रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची घटना घडली आहे. प्रत्येक राज्याकडून या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. तर ३१ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालय, जलतरण तलाव, मॉल्स, व्यायामशाळा, नाट्यगृहे, सिनेमागृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण पुण्यातील हडपसर येथील ससाणे एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूलकडून याच शासन निर्णयाला केराची टोपली दाखविण्याचे काम करण्यात आले आहे.

राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या स्कूलचे उदघाटन करण्यात आले. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने हजर होता. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एका बाजूला राज्य सरकारने शाळांना सुट्टी दिली आहे, तर दुसरीकडे अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रकरणी आदेशाचे पालन न करणार्‍या संस्थाचालक, शिक्षक यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आदेश देण्यात आले आहेत. पण भव्य असा कार्यक्रम राज्याच्या मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये घेतला गेला आहे. यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार झाला आहे. आता संबधित मंत्री आणि संस्था चालक यांच्यावर काय कारवाई केली जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

छगन भुजबळ यांनी देखील यासंदर्भात खुलासाही केला आहे. ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल इमारतीचे आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन दोन वेळा ठरले होते. पण प्रत्येक वेळी हा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करावा लागला. आजचा कार्यक्रम देखील फार पूर्वीच नियोजन केले होते. त्यामुळे आज कार्यक्रमाला आलो आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचे भाषण करणार नसून, प्रत्येकाने काळजी घ्यावी, असेही भुजबळ यांनी म्हटले.

Leave a Comment