कंबरदुखी पासून आराम मिळण्याकरिता करा हे उपाय


ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्याने किंवा सतत खाली वाकून काम करावे लागल्याने, भार उचलल्याने काही तास प्रवास केल्याने काही वेळा कंबरदुखी सुरु होते. ह्या कंबरदुखीवर वेळीच उपचार केले नाहीत, तर हे दुखणे बळावते व कायमचे होऊन बसते. त्यामुळे ही दुखणे वाढीला लागू नये यासाठी कंबरदुखी सुरु झाल्यानंतर त्वरित काही उपाय अवलंबल्याने कंबरदुखी पासून आराम मिळविता येतो.

कंबरदुखी किंवा पाठदुखी सुरु झाल्यास आईस पॅक ने कंबर किंवा पाठ शेकल्यास आराम मिळतो. यामुळे दुखणे कमी होते, व कंबरेवर किंवा पाठीवर सूज आल्यास ती ही कमी होण्यास मदत मिळते. दिवसातून दोन ते तीन वेळ आईसपॅकचा वापर करावा. हा पॅक बनविण्यासाठी एका जाडसर टॉवेल मध्ये बर्फ गुंडाळून ह्या टॉवेलने कंबरेला किंवा पाठीला शेक घ्यावा.

ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर काम करताना आपण बसतो ती खुर्ची पाठीला किंवा कंबरेला आरामदायक असेल असे पाहावे. सतत बसून काम केल्याने देखील कंबरदुखी किंवा पाठदुखी उद्भवते. यासाठी कामातून थोड्या थोड्या अंतराने वेळ काढावा आणि थोडेसे ऑफिसमध्ये चालून यावे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते, व पाठीच्या आणि कंबरेच्या स्नायुंना आराम मिळतो. खुर्चीवर बसताना आपले पोश्चर नीट असेल याची काळजी घ्यावी. मान किंवा खांदे जास्त झुकवून बसू नये. पाठीचा कणा ताठ राहील असे पाहावे.

रात्री बेडवर झोपतना आपले पोश्चर नीट नसेल, तर सकाळी कंबरेत उसण भरणे, पाठ किंवा मान दुखणे असे प्रकार सुरु होतात. यासाठी रात्री झोपताना आपले पोश्चर नीट असेल याची काळजी घ्यावी. मानेखालील उशी जास्त जाड असू नये. तसेच आपण झोपतो ती गादी देखील फार जास्त नरम नसावी. झोपताना पाठीला आधार मिळेल इतपत गाडी जाड असावी.

जर तुम्हाला कंबरदुखी किंवा पाठदुखी सतावत असेल, तर मसाज करणाऱ्या एखाद्या प्रशिक्षित व्यक्तीकडून मसाज करविणे उपयुक्त ठरू शकते. ज्या व्यक्तीने मसाज देण्याचे प्रशिक्षण घेतले आहे, अश्याच व्यक्तीकडून मसाज घेणे चांगले. ज्या व्यक्तीला मसाजचा अनुभव नाही अश्या व्यक्तीकडून मसाज करून घेणे टाळायला हवे. मसाजमुळे कंबरेचे स्नायू शिथिल होऊन त्यावरील तणाव कमी होतो, व परिणामी कंबरदुखी देखील कमी होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणीच्या दोनतीन पाकळ्या खाल्ल्याने देखील कंबरदुखी कमी होते. मसाज करिता लसुणाचे तेल वापरल्याने आराम मिळतो. हे तेल बनविण्यासाठी सम प्रमाणात खोबरेल तेल, मोहोरीचे तेल, आणि तिळाचे तेल घ्यावे. ही तीनही तेले एकत्र करून गरम करावीत, व त्यामध्ये दहाबारा लसणीच्या पाकळ्या घालाव्यात. ह्या तेलाने कंबरेची किंवा पाठीची मालिश केल्यास दुख्ण्यापासून आराम मिळतो.

कंबरेच्या आणि पाठीच्या स्नायूंना आराम मिळावा, त्यांच्यावरील ताण नाहीसा व्हावा या करिता या स्नायुंना नियमित व्यायामाची गरज आहे. त्यामुळे व्यायाम करताना कंबरेच्या आणि पाठीच्या स्नायूंच्या बळकटीसाठी असणारे व्यायामप्रकार अवश्य करावेत. सूर्यनमस्कार, हा व्यायामप्रकार पाठीच्या व कंबरेच्या स्नायुंकरिता अतिशय चांगला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment