महत्वाच्या ऑफिस मिटिंगचे मनावरील दडपण कसे घालवाल?


ऑफिसमध्ये महत्वाची मिटिंग असावी, किंवा प्रेझेंटेशन असावे, सर्व तयारी झालेली असावी आणि तरीही मनावर दडपण असावे असे नेहमीच होत असते. अगदी मिटिंगच्या ऐनवेळी पर्यंत देखील मनावरचे दडपण कायम असते. मनावरील हे दडपण जाऊन मन तणावमुक्त व्हावे या करिता काही सोपे उपाय अवलंबता येतील.

मिटिंगची सर्व तयारी आधीच करून ठेवणे अतिशय आवश्यक आहे. आपल्या प्रेझेन्टेशनच्या स्लाईड्स, इतर माहिती देणारी हँड आउट्स, याची तयारी आधीच केलेली असावी. तसेच मिटिंग मध्ये मांडण्याचे मुद्दे आणि त्यासंबंधीची माहिती हाताशी असावी. पूर्वतयारी केलेली असली, की ऐनवेळी होणारी धावपळ वाचू शकते. मिटिंग च्या ठिकाणी किंवा प्रेझेन्टेशन द्यायचे आहे त्या ठिकाणी वेळेच्या आधी पाच मिनिटे हजर राहावे. प्रेझेन्टेशन देताना किंवा मिटिंगमध्ये आपले मुद्दे मांडताना आपली बॉडी लँग्वेज कशी असावी याचा अभ्यास आधीच केलेला असावा. आपल्या हालचालींवरून, चेहऱ्यावरील हावभावांवरून आपला आत्मविश्वास प्रकट होत असतो. त्यामुळे बॉडी लँग्वेजकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

आपल्या प्रेझेन्टेशनची वारंवार रिहर्सल करणे टाळावे. एक दोन वेळा स्लाईड्स सह रिहर्सल करणे पुरेसे असते. तसेच मिटिंग सुरु असताना मोबाईलवर न्यूज फीड चेक करणे आवर्जून टाळावे. ऐनवेळी आपल्या प्रेझेन्टेशनमध्ये किंवा आपण मांडणार असलेल्या मुद्द्यांमध्ये अचानक मोठे फेरबदल करणे टाळावे. आपण मांडणार असलेल्या मुद्द्यांविषयी किंवा आपल्या प्रेझेन्टेशनविषयी कोणते प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात याचा विचार करून संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी असावी.

प्रेझेन्टेशन पूर्वी मनावरील दडपण कमी करण्यासाठी हलके संगीत ऐकावे, किंवा शक्य असेल तर एखादी पॉवर नॅप घ्यावी. त्यामुळे मनावरील तणाव कमी करता येणे शक्य होईल.

Leave a Comment