कोरोना : मुंबईसह राज्यभरात जमावबंदीचा आदेश लागू


मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. राज्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या ८६ वर पोहोचली असून मुंबई पोलिसांनीही या पार्श्वभूमीवर महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यातच आता आजपासून मुंबईसह राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग गर्दीमुळे होत असल्याने अनावश्यक गर्दी नागरिकांनी टाळावी, या हेतूने पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

त्याचबरोबर राज्यभरातील मोठे कार्यक्रम, यात्रा, उत्सव रद्द करण्यात आले आहेत. तर गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गृहखात्याशी चर्चा करून राज्यातील परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे आढावा घेणार आहेत.

दरम्यान, कोरोनाचे पाच रुग्ण मुंबईत आढळताच राज्य सरकारने मुंबईतील थिएटर, नाट्यगृहे, जीम आणि तरणतलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना पुढील आदेश येईपर्यंत परवानगी न देण्याचा आणि ज्यांना यापूर्वी परवानगी दिली आहे, त्यांची परवानगी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर नागरिकांना मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे तसेच विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Comment