स्थूल बांधा असल्यास असे राहा फिट


स्थूल बांधा असलेल्या व्यक्तींच्या शरीरामध्ये पोट, मांड्या, या ठिकाणी जास्त मेद साठण्याची प्रवृत्ती असते. हे टाळण्यासाठी काही ठराविक पद्धतीचा व्यायाम आणि आहाराशी संबंधित काही गोष्टींचा अवलंब करणे अगत्याचे आहे. व्यायामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर या व्यक्तींनी दररोज सकाळच्या वेळी सुमारे तासभर व्यायाम करण्याची गरज आहे. या व्यक्तींचा व्यायाम एरोबिक आणि योग यांचे मिश्रण असलेला हवा. स्थूल व्यक्तींनी व्यायाम आणि आहाराबद्दल अतिशय काटेकोर राहणे आवश्यक आहे. स्थूल व्यक्तींच्या शरीरातील चयापचय, म्हणजेच मेटाबोलिक रेट कमी झालेला असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरातील ऊर्जा लवकर खर्च न होता, त्याचे रूपांतर मेदामध्ये होते. त्यामुळे स्थूल व्यक्ती करीत असलेला व्यायाम आणि आहारनियमन शरीराचे चयापचय वाढविण्याकरिता करणे गरजेचे असते. या साठी एरोबिक आणि योग अशी मिश्र व्यायामपद्धती सहायक ठरू शकते.

धनुरासन, नौकासन, भुजंगासन, पवनमुक्तासन ही आसने स्थूल व्यक्तींसाठी अतिशय फायद्याची ठरतात. तसेच सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करणे अतिशय लाभकारी ठरते. वजन कमी करण्यासाठी व मसल टोनिंग साठी योगाबरोबर ‘कार्डियो’, किंवा एरोबिक व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. या साठी जलद गतीने चालणे, पोहोणे, सायकलिंग, जॉगिंग इत्यादी व्यायामप्रकारांचा अवलंब कारावा. तसेच स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंग्थ ट्रेनिंग, म्हणजेच स्नायूंच्या बळकटीसाठी वेट लिफ्टिंग, हे व्यायामप्रकार देखील अवलंबावेत. हे व्यायामप्रकार करताना प्रशिक्षित व्यक्तींच्या निगराणीखाली करावेत. यामुळे व्यायामातून कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा होणे टाळता येईल. आठवड्यातून किमान चार दिवस व्यायम आवश्यक आहे.

व्यायामाबरोबर आहारनियमनाची देखील आवश्यकता असते. स्थूल व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये ३० टक्के कॉम्प्लेक्स कर्बोदके, ४५ टक्के प्रथिने, आणि २५ टक्के शरीरास हितकारक फॅट्स चा समावेश करायला हवा. या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये फॅट वाढविणारे पदार्थ, म्हणजेच मैद्याचे पदार्थ किंवा गोड, तेलकट पदार्थ नियंत्रित ठेवायला हवेत. तसेच भाज्या व ताज्या फळांचे सेवन आपल्या आहारात समाविष्ट करायला हवे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment