भारतवंशी ब्रिटीश अर्थमंत्री ऋषी सनक यांचा पहिला अर्थसंकल्प


ब्रिटनच्या संसदेत भारतीय वंशाचे ब्रिटीश अर्थमंत्री ऋषी सनक यांनी त्यांचा पाहिला अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे सनक यांनी अनेक महत्वपूर्ण बाबी लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प बनविला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी या अर्थसंकल्पात करोना विषाणूशी लढा देण्यासाठी वेगळी आर्थिक तरतूद केली आहे. ऋषी सनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.

बुधवारी हा अर्थसंकल्प सादर करताना ३९ वर्षीय ऋषी यांनी संसदेच्या हाउस ऑफ कॉमन्स मध्ये भाषण करताना करोना मुळे आलेली आर्थिक सुस्ती आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीत होत असलेली उलथापालथ निपटण्यासाठी ३० अब्ज पौंडा ची तरतूद केल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाने देशाच्या हितासाठी काम करण्याचा वादा निवडणुकीत केला होता तो पूर्ण केला आहे.

सनक म्हणाले करोना विषाणूचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्याला ब्रिटन अपवाद नाही. मात्र हे आर्थिक संकट तात्पुरते असेल आणि सर्वानी एकजुटीने त्याचा मुकाबला करायला हवा. सनक यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि गृहमंत्री प्रीती पटेल यांनी कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

Leave a Comment