शॅडो कॅबिनेटवर टीका करणाऱ्या शिवसेनेला मनसेचे उत्तर


मुंबई : राज ठाकरेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट म्हणजेच प्रतिरुप मंत्रिमंडळाची घोषणा केली. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून मनसेच्या या शॅडो कॅबिनेटची खिल्ली उडवण्यात आली. पण आता मनसेही या टीकेला उत्तर दिले आहे. रडत राऊतची शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने तंतरली, अशा शब्दात ट्विटद्वारे मनसे नेते अमेय खोपकर यांनी शिवसेनेला उत्तर दिले आहे.

शॅडो कॅबिनेटची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात करण्यात आली. ‘सामना’च्या अग्रलेखातून मनसेच्या या शॅडो कॅबिनेटवर जोरदार टीका करण्यात आली. ‘सामना’तून मनसेच्या शॅडो कॅबिनेटची ‘शॅडो वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच’ अशा शब्दात खिल्ली उडवण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘सामना’तून शॅडो मुख्यमंत्री आणि शॅडो राज्यपालांची नेमणूकही व्हायला हवी होती, असा टोलाही लगावला आहे.


पण यानंतर ट्विटच्या माध्यमातून मनसे नेते अमेय खोपकर यांनी शिवसेनेला विशेषत: खासदार संजय राऊत यांना उत्तर दिले. त्यांनी शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झाला आहे. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात ‘मोठी तिची सावली’ हा अग्रलेख लिहायला लागू नये असे काम महाखिचडीने करावे या सदिच्छा, असे म्हटले आहे.

Leave a Comment