‘या’ देशांमध्ये प्रवास न करण्याची आरोग्य मंत्रालयाची सूचना


नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून हा खतरनाक व्हायरस आता भारतातही पसरत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. या संपूर्ण स्थितीवर भारत सरकार लक्ष ठेवत असून याबाबत सातत्याने ठोस पावले उचलली जात आहेत. भारताने याचदृष्टीने आणखी तीन देशांच्या नागरिकांना भारतात प्रवेशासाठी तात्पुरती बंदी घातली आहे. फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन या देशांचा यामध्ये समावेश आहे. सध्या भारतात येण्याची या देशातील नागरिकांना परवानगी नाही.

अद्याप, भारतात दाखल न झालेल्या, प्रवेश न केलेल्या फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमधील नागरिकांच्या नियमित आणि ई-व्हिसावर बंदी घालण्यात आली आहे. एक नोटिफिकेशन ‘ब्यूरो ऑफ इमिग्रेशन’कडून जाहीर करण्यात आले आहे. भारतात अद्याप प्रवेश न केलेल्या, परंतु नियमित आणि ई-व्हिसा जारी करण्यात आलेल्या फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमधील नागरिकांचा व्हिसा त्वरित रद्द करण्यात येत असल्याचे, नोटिफिकेशनमध्ये जाहीर करण्यात आले आहे.

चीन, इटली, ईराण, रिपब्लिक ऑफ कोरिया, जपान, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमध्ये प्रवास न करण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लोकांना सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता या देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर इटली आणि दक्षिण कोरियातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना व्हायरसचे निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment