लवकरच येणार दीर्घकाळ टिकणाऱ्या वार्निश केलेल्या नोटा

नोटा लवकर खराब होण्याची समस्या सर्वांना येत असते. आता यावर उपाय म्हणून लवकरच आरबीआयकडून 100 रुपयांच्या नवीन वार्निश नोट जारी केली जाणार आहे. यासाठी आरबीआयला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे. सध्या केवळ 100 रुपयांच्या वार्निश नोटा जरी केल्या जाणार असून, याचा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात इतर नोटा जारी केल्या जातील.

सध्या 100 रुपयांचे सरासरी आयुष्य अडीच ते साडेतीन वर्ष असते. मात्र वार्निश नोटा 7 वर्ष टिकतील. मात्र यामुळे 100 रुपयाची नोट निर्मिती करण्यासाठी लागणारा खर्च देखील वाढणार आहे.

आरबीआयने 2018-19 या वर्षाच्या रिपोर्टमध्येच वार्निश नोटा जारी केले जाणार असल्याचे सांगितले होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, आरबीआयकडून शिमला, जयपूर, भुवनेश्वर म्हैसूर आणि कोच्चीमध्ये प्रायोगिक परीक्षणाच्या आधारावर 100 रुपयांच्या वार्निश नोटा जारी करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

वार्निश नोट म्हणजे काय ?

लाकडाच्या वस्तू खराब होऊ नये यासाठी वार्निशचा वापर केला जातो. लाकडावर दिसणाऱ्या चमकदार आणि पारदर्शी लेयरलाच वार्निश म्हटले जाते. वार्निशच्या थरामुळे नोट घाण होणार नाहीत व दीर्घकाळ टिकतील.

नोटांना वार्निश करण्याचा सर्वात प्रथम प्रयोग 1958 ला हॉलंडमध्ये पीपीजी पॉलीमाइडद्वारे तयार करण्यात आलेल्या नोटांवर करण्यात आला होता. भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे. सध्या 100 रुपयांच्या 1 हजार नोटा छापण्यासाठी जवळपास 1570 रुपये खर्च येतो. वार्निशमुळे या खर्चात 20 टक्के वाढ होईल.

Leave a Comment