
पुणे – शेतकऱ्यांची सावकारी कर्जे राज्य सरकारने माफ केल्याबद्दल मी महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करतो. पण भाजप सरकारच्या काळातच हा निर्णय घेतला गेला होता. तो काही तांत्रिक बाबींमुळे अपूर्ण राहिला होता. ही तांत्रिक बाब या सरकारने दूर केली एवढेच असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.
भाजप सरकारच्या काळातच झाला होता ‘सावकारी कर्जमाफी’चा निर्णय
त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. नोंदणीकृत सावकारीपेक्षा खासगी सावकाराची समस्या मोठी आहे. विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन सरकारने एकत्र या प्रश्नांवर मार्ग काढला पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
आगामी मुंबई महापालिका निवडणूक हा विषय राज ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या भेटीमध्ये नव्हता. ते दोघे मित्र असल्यामुळे ते भेटले असे स्पष्ट करत, भाजपने राज ठाकरे यांच्या व्यापक हिंदूत्वाच्या भूमिकेचे स्वागतच केले आहे. पण, राज ठाकरेंची परप्रांतीयांबाबतची भूमिका जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मनसेला सोबत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ही आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
