सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द


पुणे : राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने तातडीने तयारी सुरु केली आहे. याकरिता मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून सर्व रुग्णालयांमध्ये युद्ध पातळीवर तयारी करण्यात येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारी रुग्णालातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे, योग्य त्या उपाययोजना सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. अजित पवारांनी पुणे आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबतही बैठक घेऊन आढाला घेतला असून उपाययोजना करण्यात कुठलीही कसर ठेवू नका अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, ‘कोरोना’चे दोन रुग्ण पुण्यात आढळून आल्याने चिंता वाढली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुणे महापालिकेने युद्ध स्तरावर कामाला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी वेगळ्या रुग्णालयाची आणि आयसोलेशन वॉर्डसची गरज असल्याने अवघ्या काही तासांमध्ये पालिकेने 200 खाटांची व्यवस्था केली असून लवकरच हे तात्पुरते रुग्णालय सुरु होणार आहे.

हे तात्पुरते रुग्णालय राजयोग सोसायटी आणि सणस मैदानातील इमारतीत सुरू करण्यात आले असून या ठिकाणी कोरोनाची लागण झालेल्या 2 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टरांचे पथक आणि इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची महिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

प्रशासन कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले असून विभागीय आयुक्तालयात तातडीची बैठक झाली. यात विभागीय आयुक्त, कलेक्टर, पालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी बैठकीत हजर आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरूअसून त्यांना खास वॉर्ड्समध्ये ठेवण्यात येणार आहे.

Leave a Comment