विमान कर्मचाऱ्यांच्या द्वारे प्रवाश्यांना या कारणांस्तव केली जाऊ शकते प्रवासास मनाई


विमानाने प्रवास करीत असताना विमानातील सेवाकर्मचारी नेहमीच हसतमुखाने प्रवाश्यांच्या सेवेसाठी तत्पर असतात. मात्र अनकेदा प्रवाश्यांच्या बेजबाबदार वागण्याने इतर प्रवाश्यांना त्रास होत असल्याचे लक्षात आल्यास, विमान कर्मचाऱ्यांशी किंवा सहप्रवाश्यांशी असभ्य वर्तन केल्यास, किंवा विमान प्रवासाच्या दरम्यान पाळावयाचे नियम न जुमानणारे प्रवासी विमानामध्ये असल्यास, विमान कर्मचाऱ्यांना देखील नम्रपणा बाजूला ठेऊन या प्रवाश्यांना वेळीच समज देणे आवश्यक ठरते. अश्या वेळी त्रासदायक किंवा नियमांचा भंग करणाऱ्या प्रवाश्यांना विमानातून खाली उतरविले गेले असल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळत असतात. या शिवाय इतरही अनेक कारणांस्तव प्रवाश्यांना विमानामध्ये प्रवास करण्याला मनाई करण्याचा हक्क विमान सेवा कर्मचाऱ्यांना आहे. ही कारणे कोणती, ते जाणून घेऊ या.

गर्भवती महिलेच्या प्रेग्नन्सीचा छत्तीस आठवड्याहून अधिक काळ उलटून गेला असेल, म्हणजेच महिलेच्या गर्भावस्थेच्या आठव्या महिन्यानंतरच्या काळामध्ये जर महिला विमानाने प्रवास करत असेल तर तिला विमानाने प्रवास करण्याची परवानगी नाकारण्याचा हक्क विमानसेवा कर्मचाऱ्यांना आहे. किंबहुना गर्भावस्थेतील सातव्या महिन्यानंतर विमानाने प्रवास करायचा झाल्यास प्रवास करण्यास सदर महिला सक्षम असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट प्रवासी महिलेने सादर करणे आवश्यक आहे. हे सर्टिफिकेट प्रवासाच्या तीन दिवसांपेक्षा जास्त काळ आधी घेतलेले नसावे. हे सर्टिफिकेट नसलयास संबंधित महिलेला प्रवासाला परवानगी नाकारण्याचा हक्क विमान कंपनीला आहे.

मद्याच्या धुंदीमध्ये असलेल्या प्रवाश्यांनाही विमानामध्ये प्रवेश नाकारण्याचा हक्क विमान कंपनीला आहे. मद्याच्या धुंदीमध्ये असणारे प्रवासी इतर प्रवाश्यांसाठी त्रासदायक ठरू शकतात. तसेच अश्या प्रवाश्यांच्या सोबतीने प्रवास करणे इतरांसाठी गैरसोयीचे ठरू शकते. ही शक्यता लक्षात घेता मद्याच्या धुंदीमध्ये असलेल्या प्रवाश्यांना विमान प्रवासाची परवानगी नाकारली जाऊ शकते. विमान प्रवासासाठी निघालेला एखादा प्रवासी गंभीर रित्या आजारी असेल, आणि संसर्गजन्य रोगाने ग्रस्त असेल, तर त्या प्रवाश्याला विमानाने प्रवास करण्यास परवानगी नाकारण्याचा हक्क विमान कंपनीला आहे. प्रवासी आधीपासूनच आजारी असताना विमान प्रवास करणार असेल, तर त्याच्या आजाराचे स्वरूप स्पष्ट करणारी सर्व माहिती विमान कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक असून, तसे वैद्यकीय प्रमाणपत्र जवळ बाळगणे ही आवश्यक आहे. एखाद्या प्रवाश्याचा आजार बळाविण्याची शक्यता विमानातील कर्मचाऱ्यांना जाणविली, तरीही प्रवाश्याला प्रवास करण्याची परवानगी नाकरली जाऊ शकते.

आपत्तीजनक पोशाख परिधान करणाऱ्या प्रवाश्यांना विमान प्रवास करण्यास परवानगी नाकरली गेल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. तसेच विमान प्रवासाच्या दरम्यान पाळावयाच्या नियमांचा भंग केल्यासही प्रवाश्यांना विमानातून प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात येत असते.

Leave a Comment