अचानक येऊ शकणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याबाबत अशी घ्यावी खबरदारी


हृदयाचा झटका येण्याची शक्यता उतारवयापुरती किंवा केवळ हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींपुरती मर्यादित नाही. आजकालच्या काळामध्ये संपूर्णपणे निरोगी तरुण तरुणींना देखील हृदयविकाराचा झटका आल्याची अनेक उदाहरणे पहावयास मिळत असतात. अलीकडच्या काळामध्ये मॅरथॉन धावत असताना एखाद्या धावपटूला अचानक हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याच्या घटना क्वचित का होईना पण घडत आहेत. वैद्यकीय तज्ञांच्या मते या धावपटूंना हृदयविकाराचे झटके व्यायाम करताना किंवा धावताना येत नसून विश्रांतीच्या काळामध्ये येण्याची शक्यता अधिक असते. इतरांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पण धावपटूंच्या बाबतीत धावत असताना अचानक हृदयविकाराचा झटका येण्यामागे इतरही काही कारणे असू शकतात. हा हृद्यविकाराचा झटका कश्यामुळे येतो याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले, तरी वैद्यकीय तज्ञांच्या मते, धावताना एखाद्या धावपटूला हृदयविकाराचा झटका येणार असल्यास त्याची काही निश्चित लक्षणे आधीपासूनच दिसू लागतात.

धावत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्युमुखी पडलेल्या धावपटूंमध्ये एकूण तीस टक्के धावपटूंमध्ये ही लक्षणे आढळून आली असली, तरी या लक्षणांकडे योग्यवेळी लक्ष न दिल्याने हे धावपटू मृत्युमुखी पडले. त्यामुळे धावत असताना अशी लक्षणे उद्भवली, तर त्वरित वैद्यकीय मदत मागविणे आवश्यक आहे. अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास, किंवा छातीमध्ये आवळून आल्यासारखे वाटल्यास हे हृदयविकाराचा झटका येण्याचे लक्षण असू शकते. छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे, अचानक छातीमध्ये वेदना होऊ लागणे, किंवा अस्वस्थ वाटणे या धोक्याच्या सूचना असू शकतात.

व्यायाम करीत असताना किंवा धावत असताना अचानक शुद्ध हरपणे, हृदयाचे ठोके अतिशय जलद, वेगाने पडण्यास सुरुवात होणे, अचानक चक्कर येऊ लागणे, ही लक्षणे देखील धोक्याचे इशारे आहेत. हे लक्षणे जाणविल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अश्या वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक त्या चाचण्या, तपासण्या करून घेणेही गरजेचे आहे. तसेच पुढील काही काळासाठी व्यायाम देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी-जास्त करणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment