लग्नसराईच्या काळामध्ये फिट राहण्यासाठी अवलंबा हे उपाय


सध्या लग्नसराईचा काळ सुरू असून, आपल्यापैकी प्रत्येक जण ह्या समारंभांना आमंत्रित असाल, किंवा तुमच्या परिवारामधेच लग्नकार्य होत असतील. हा काळ अतिशय गडबडीचा असतो. सर्व समारंभांना उपस्थित राहताना आपल्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत आपण काहीसे निष्काळजी होतो. तसेच काही वेळा शरीरास विश्रांतीची आवश्यकता आहे हे लक्षात येऊनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या समारंभांच्या गडबडीमध्ये आपल्या तब्येतीची होणारी हेळसांड आपण नजरेआड करायचा प्रयत्न करतो खरा, पण नंतर हीच हेळसांड आपल्याला भोवते, आणि त्यातून आजारपण उद्भवते. पण या बाबतीत आपण थोडी काळजी सुरुवातीपासूनच घेतली तर ही लग्नसराईच्या काळातील धावपळ आपल्याला जड जाणार नाही.

लग्न समारंभ आणि तऱ्हे-तऱ्हेचे खाद्यपदार्थ हे गणित पक्के जुळलेले असते. आजकाल मुख्य जेवणाच्या पदार्थांसोबतच अन्य कित्येक तऱ्हेच्या पदार्थांची रेलचेल असते. विशेषतः चाट, पाणी पुरी, चायनीज पदार्थ, अश्या पदार्थांच्या काऊंटर्सच्या भोवती नेहमीच गर्दी पहावयास मिळते. आपण ही ह्या पदार्थांवर, इतर जेवणाच्या जोडीने ताव मारण्याचा मोह आवरू शकत नाही. परिणामी अपचन, पोट फुगणे, गॅसेस, अॅसिडीटी, पोट बिघडणे हे त्रास उद्भवतात. त्यामुळे लग्नसमारंभात जेवताना, सर्व पदार्थ थोडे थोडे खा. त्याने पोटही भरेल आणि आपला आवडता पदार्थ आपल्याला खायला मिळाला याचे समाधानही होईल. तसेच लग्नघरामध्ये सतत कामांमध्ये व्यस्त असलेल्यांनी ही दिवसभरात थोडे थोडे खात राहावे. त्यामुळे अंगामध्ये ताकद राहून थकवा कमी होतो.

आपण मेजवानी मध्ये निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर आनंदाने ताव मारीत असतो. पण त्या पदार्थांच्या द्वारे किती अनावश्यक कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जात असतात, याचा विचार आपण करीत नाही. या कॅलरीज खर्च करण्यासाठी आवश्यक तो व्यायाम घेणे देखील आवश्यक असते. त्यामुळे आपल्या व्यस्त दिनक्रमातून काही वेळ व्यायामासाठी जरूर द्यावयास हवा. व्यायाम केल्याने शरीरामध्ये स्फूर्ती येऊन मनही उल्लसित राहते. तसेच शरीराची पाचनशक्ती व्यायामामुळे चांगली राहून त्यासंबंधीचे विकार उद्भवत नाहीत.

या काळामध्ये स्वतःला ‘ हायड्रेटेड ‘ ठेवायला विसरू नका, म्हणजेच भरपूर पाणी प्या. मेजवानीतील तेलकट, पचण्यास जड असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने शरीरामध्ये अनेक तऱ्हेची टॉक्झिन्स जात असतात. भरपूर पाणी प्यायल्याने हे घातक पदार्थ शरीराबाहेर सहजी टाकले जातात. तसेच पाणी प्यायल्याने त्वचेची आर्द्रता टिकून राहते. पाणी पीत राहल्याने भूक ही नियंत्रणात राहील, आणि मनाला येईल ते पदार्थ, हव्या तितक्या प्रमाणात खाण्याचा मोह आवरणे जमू शकेल.

आपल्या कडील लग्नसमारंभातील मेजवान्या अनेक गोड पदार्थांशिवाय अपुऱ्या म्हणायला हव्यात. पण गोड खाण्यावर नियंत्रण ठेवायला हवे. तसेच या काळामध्ये शारीरिक आणि काही प्रमाणात मानसिक थकवा देखील येत असतो. हा थकवा घालाविण्याकरिता दररोज थोडावेळ मेडीटेशन करावे.

Leave a Comment