नरेश गोयल यांच्या निवासस्थानी ईडीची धाड


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्या खंबाला हिल येथील घरावर धाड टाकली असून गोयल यांचा मनी लाँड्रींग प्रकरणात समावेश असल्याच्या संशयामुळे ईडीने त्यांच्या विरोधात ही कारवाई केली आहे.

ईडीने यापूर्वी फेमा अंतर्गत दिल्ली आणि मुंबई येथे 12 ठिकाणी तपासणी केली होती. जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांच्या घरांचा त्यात समावेश होता. गोयल यांच्या विविध 19 कंपन्यांची माहिती या तपासणीमध्येच समोर आली होती. यातील 5 कंपन्यांची नोंदणीही झालेली आहे. या अगोदर नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांनी 25 मे 2019 ला लंडनला पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण या दोघांच्या विरोधात लूक आउट नोटीस निघाल्यामुळे त्यांना तत्काळ विमानातून उतरवून पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते. या कंपन्यांवर नरेश गोयल अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवण्याचे काम करत होते. गोयल यांनी कर वाचवण्यासाठी अनेक परदेशी कंपन्यांसोबतही काही आर्थिक व्यवहार केल्याचे पुरावे ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाले आहेत.

Leave a Comment