टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत शफाली वर्मा अव्वलस्थानी विराजमान


नवी दिल्ली – जागतिक टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाची युवा धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा हिने अव्वल स्थान पटकावले आहे. महिला टी २० क्रिकेटपटूंची ताजी यादी आयसीसीने नुकतीच जाहीर केली असून शफाली या क्रमवारीत तब्बल १९ स्थानांची झेप घेत पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सुझी बेट्सला तिने मागे टाकले. एका स्थानाने घसरण होऊन सुझी बेट्स ही दुसऱ्या स्थानी विराजमान झाली आहे. सुझीचे ७५० गुणांक आहेत, तर शफाली ७६१ गुणांकासह अव्वल आहे. सुझी या क्रमवारीत ऑक्टोबर २०१८ पासून अव्वल स्थानी होती. अखेर १७ महिन्यांनी तिला दुसऱ्या स्थानी ढकलत शफालीने अव्वल स्थान पटकावले.


भारत टी २० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला होता. शफालीचे त्यात महत्त्वाचे योगदान होते. शफालीने प्रत्येक सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. शफालीने अनुक्रमे २९, ३९, ४६ तर चौथ्या सामन्यात ४७ धावा केल्या. यात तिने दोन सामन्यांमध्ये सामनावीराचा किताब पटकावल्यामुळे सध्या ती टी २० विश्वचषक स्पर्धेत १६१ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.


भारताकडून दमदार कामगिरी करत शफालीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. यासह महिला आणि पुरूष अशा दोन्ही क्रिकेटमध्ये मिळून टी २० जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी शफाली सर्वात तरूण भारतीय क्रिकेटपटू ठरली. त्याचबरोबर भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्यानंतर टी २० क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली.

Leave a Comment