खेळ खेळा आणि तणावमुक्त रहा…


आजकालच्या आपल्या बैठ्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, डायबेटीस यांसारखे ‘लाईफस्टाईल डिसिजेस’ होण्याचे प्रमाण वाढीला लागले आहे. सुदैवाने आता याबद्दल समाजामध्ये जागरुकता यावयास लागली आहे. हे विकार टाळण्यासाठी लोक आपल्या आहारावर नियंत्रण ठेवत आहेत, तसेच व्यायामाची सवयही आत्मसात करीत आहेत. लहान मुलांपासून ते अगदी सत्तर- ऐंशीच्या घरातील वृद्धांपर्यंत सर्वच जण आता आपल्या जीवनशैलीचा काळजीपूर्वक विचार करताना दिसत आहेत. फिट राहण्याच्या दृष्टीने आहारावर नियंत्रण ठेवतानाच, निरनिराळ्या व्यायाम पद्धतींचा अवलंब लोक करताना दिसत आहेत. कोणी रनिंग, जॉगिंग, सायकलिंग, तर कोणी योग, एरोबिक्स, पोहणे, चालणे असे तऱ्हेतऱ्हेचे व्यायाम करीत असतात. एखादा खेळ खेळणे हा देखील उत्तम व्यायामप्रकार असून, त्याकडेही लोकांचा कल वाढताना दिसत आहे. मग फूटबॉल असो, किंवा बॅडमिंटन, आपल्या आवडत्या खेळाकडे लोक आता व्यायामाचा उत्तम पर्याय म्हणून पाहायला लागले आहेत. आपला आवडता खेळ खेळण्याचा समावेश जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये केलात, तर तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्रीय रहालच, पण त्याशिवाय तुमच्या हृदयाचे आणि शरीरातील स्नायूंचे आरोग्यही उत्तम राहील.

खेळ खेळण्याने तुम्ही शारीरिक आणि मनासिक दृष्ट्या सक्रीय रहाल. यामुळे मन तणावमुक्त होऊन मनामध्ये नकारात्मक विचार येणार नाहीत. खेळण्यामुळे शरीरामध्ये स्फूर्ती येऊन मन उत्साही राहण्यास मदत होते. तसेच शरीरामध्ये ‘ एंडोर्फिन ‘ नामक ‘ फील गुड ‘ हार्मोन सक्रीय होऊन मन प्रफुल्लित राहते. त्यामुळे मनावरील कामाचा किंवा अन्य कोणत्याही प्रकारे आलेला ताण नाहीसा करायचा असेल, तर दिवसातला थोडा अवधी आपला आवडता खेळ खेळण्यासाठी खर्च करावा.

जसजसे आपले वय वाढत जाते, तसतसे आपल्या शरीरातील मास-पेशी, स्नायू आणि हाडे कमकुवत होण्यास सुरुवात होते. अशा वेळी खेळण्यामुळे होत असलेली शारीरिक हालचाल हाडे आणि सांधे बळकट होण्यास मदत करते. त्यामुळे आपला आवडता खेळ टीव्हीवर पाहण्याऐवजी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये या खेळाचा सक्रीय समावेश करा. ‘ ब्रिटीश पार्लमेंटरी ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी ‘ या संस्थेने प्रदर्शित केलेल्या अहवालानुसार, कोणत्याही खेळाचा अवलंब व्यायाम म्हणून केल्यास, निरनिराळ्या ककर्करोगांपासून बचाव होण्याची शक्यता तीनशे टक्क्यांनी वाढते.

ज्या महिला दर दिवशी किमान एक तास एखादा खेळ सक्रियपणे खेळतात, त्यांना स्तनाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता अगदी नगण्य असते. त्यामुळे महिलांनी ‘ मॉडरेट इंटेन्सिटी ‘, म्हणजेच कमी शारीरिक मेहनत आवश्यक असलेल्या खेळांचा समावेश आपल्या दैनंदिन आयुष्यात करायला हवा. सायकलिंग, स्विमिंग हे खेळ, याचे उदाहरण आहे. ज्या व्यक्ती सुरुवातीपासून अगदी निष्क्रिय असतात, किंवा ज्यांना कोणत्याही व्यायामाची अजिबात सवय नसते, त्यांनी खेळाला सुरुवात करताना मॉडरेट इंटेन्सिटी असणारा खेळ स्वीकारावा. जसजसा त्यांचा स्टॅमिना वाढत जाईल, तसे त्यांनी हाय इंटेन्सिटी असणाऱ्या खेळांकडे वळावे. सुरुवातीलाच जास्त शारीरिक हालचालीची आवश्यकता असणारे खेळ निवडले, तर त्यातून स्नायूंना अपाय होण्याची शक्यता असते. त्यामुळे लो इंटेन्सिटी खेळांपासून सुरुवात करावी.

खेळाच्या रूपाने शरीराला आवश्यक तो व्यायाम मिळाल्याने शरीराचे स्नायू बळकट होतात, पचनशक्ती सुधारते आणि रात्री झोपही चांगली लागते. रात्री झोप चांगली लागल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही एकदम ताजेतवाने झालेले असता. त्यामुळे दिवसभर शरीरामध्ये उत्साह टिकून राहतो, व मनही तणावमुक्त राहते. खेळ खेळल्याने शरीराला मिळालेल्या व्यायामाने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच शरीर आणि मन दोन्ही फिट राहिल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment