तुम्ही पाहिला का नव्या बाँडपटाचा मराठी ट्रेलर ?


मागील बऱ्याच दिवसांपासून बाँडपटातील २५ व्या ‘नो टाइम टू डाय’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या सीरिजमुळे अभिनेता डॅनियल क्रेग जेम्स बॉन्ड या नावानेच लोकप्रिय असल्यामुळे या चित्रपटाबाबत चाहते कमालीचे उत्सुक आहेत. हा चित्रपट तब्बल दहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून ज्यात हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, भोजपुरी, बंगाली, मल्याळम या भाषांचा समावेश आहे. नुकताच या चित्रपटाचा मराठी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

३ एप्रिल ऐवजी आता २ एप्रिलला ‘नो टाइम टू डाय’ हा चित्रपट भारतात रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या कमाईसाठी संपूर्ण आठवड्याचा फायदा व्हावा, यासाठी या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. २००६ साली ‘कसिनो रॉयल’ मधून डॅनियलने ‘जेम्स बॉन्ड’च्या सीरिजमध्ये एन्ट्री केल्यानंतर ‘क्वांटम ऑफ सोलेस’, ‘स्कायफॉल’ आणि ‘स्पेक्ट्रम’ यामध्ये त्याने जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती. ब्रिटनच्या बॉक्स ऑफिसवर ‘स्कायफॉल’ या सीरिजने बरेच विक्रम रचले होते.

आता पुन्हा एकदा डॅनियल ‘नो टाइम टू डाय’ या चित्रपटातून जेम्स बॉन्डच्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कॅरी फुकुनागा करत आहेत. जेम्स बॉन्डसोबतच बॉन्ड गर्ल्सचीही चर्चा पाहायला मिळते. ‘नो टाइम टू डाय’ मध्ये अना दे अमर्स ही बॉन्ड गर्ल बनणार आहे. तर, ऑस्कर विजेता अभिनेता रामी मालेक हा विलनच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर, दाली बेनसाला आणि लॅशा लिंच या कलाकारांची देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment