दिल्ली सरकारची कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला चालवण्यास परवानगी


नवी दिल्ली – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) नेते कन्हैया कुमारवरसह अन्य दोघांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास दिल्लीतील विद्यमान केजरीवाल सरकारने परवानगी दिली आहे. दिल्ली सरकारकडे यासंबधीची स्पेशल सेलने मंजूरी मागितली होती. कन्हैया कुमारसह उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्यवर याप्रकरणी खटला दाखल करण्यात येणार आहे.

दिल्ली पोलिसांनी 14 जानेवारीला सीआरपीसी 173(2) कलमाअंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी 10 जानेवारीला स्पेशल सेलने दिल्ली सरकारकडे कन्हैयावर देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी परवानगी मागितली होती. याप्रकरणी गृह विभागाने पुरावेही दाखल केले होते. राज्य सरकारची देशद्रोह प्रकरणी आरोपपत्र दाखल करताना मंजुरी घ्यावी लागते. दिल्ली सरकारकडे याच्या मंजुरीची फाईल पाठवण्यात आली होती. दरम्यान हे प्रकरण गेल्या 1 वर्षापासून प्रलंबित ठेवल्यामुळे भाजपकडून आम आदमी पक्षावर टीकाही करण्यात आली होती.

कन्हैया कुमारने जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील एका कार्यक्रमामध्ये ९ फेब्रुवारी २०१६ ला कथित देशविरोधी घोषणा दिल्या होत्या, असा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. पुराव्याचा अभाव असल्यामुळे त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. कन्हैयाने त्याच्या विरुद्धचे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. संसद हल्ल्यातील सूत्रधार अफजल गुरू याच्या फाशीविरोधात हा कार्यक्रम घेण्यात आला. जेएनयूत झालेल्या या कार्यक्रमातील गोंधळाचे पडसाद देशभरात उमटले होते.

Leave a Comment