वर्ध्यातील 112 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 1 कोटी 5 लाख रुपये


मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर केली असून याआधी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत 68 गावांतील 15358 शेतकऱ्यांचा समावेश होता. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा समावेश होता. त्यांनतर आता कर्जमाफीची दुसरी यादीही जाहीर झाली असून वर्धा जिल्ह्यातील दुसऱ्या यादीतील माहिती समोर आली आहे.

वर्धा जिल्ह्यातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा दुसऱ्या यादीत समावेश आहे. आधार प्रामाणिकरणाची प्रक्रिया वर्धा जिल्हा प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे. पहिल्या यादीत वर्ध्यातील दोन गावांमधील 166 शेतकऱ्यांचा समावेश होता. ज्याअंतगर्त त्यातील 154 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित 12 पैकी 8 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण न झाल्याने तर चार शेतकरी मृत आल्याने सध्या लाभापासून वंचित आहे.

8 आधार ऑथेंटिकेशन न झालेले शेतकरी आधार नंबर बँक अपलोड करतील किंवा कोण याबाबत चर्चा सुरु आहे. तर 1 कोटी 5 लाख 94 हजार रुपये 154 शेतकऱ्यांपैकी 112 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात 61084 लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 57 हजार 733 शेतकऱ्यांचे आधार अपडेट आहे. तर 11 हजार 143 शेतकऱ्यांची यादी अद्यापही बाकी आहे.

ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज 2 लाख रुपयांपर्यंतचे आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा ठाकरे सरकारने नागपूरमधील पहिल्या अधिवेशनात केली होती. आता त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कर्जमाफीची पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर झाली होती. सरकारकडे आत्तापर्यंत 35 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती आली आहे. त्यावर काम सुरु झाले असून ही यादी टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाईल. यात पूर्ण पारदर्शकता असेल. पहिल्या सरकारच्या काळात आम्ही लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची मागणी केली होती. पण ती यादीच जाहीर झाली नाही. म्हणून आम्ही प्रथम याद्या तयार करण्याचे काम हाती घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात दिली होती.

Leave a Comment